कोल्हापुरातील ‘या’ ठिकाणी गुंगीचा स्प्रे मारून घरफोडी...

<p>कोल्हापुरातील ‘या’ ठिकाणी गुंगीचा स्प्रे मारून घरफोडी...</p>

कोल्हापूर – पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महार्मागालगत असणाऱ्या टोप येथे गुंगीचा स्प्रे मारून घरफोडी केल्याचा प्रकार घडला आहे. या घरफोडीत सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. काल गुरुवारी रात्री १०.३० ते पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. 
टोप  येथील  वैभव बाळासो पाटील यांच्या घरी चोरट्यांनी घरासमोरील पाळीव कुत्र्यांला गुंगीचे औषध घातले, आणि घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात झोपलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारुन घरातील तिजोरी उघडून तिजोरीतील दोन तोळे सोन्याचे दागीने, चांदीचे दागिने, तीन मोबाईल फोन, रोख ३० हजार रुपये असा ३ लाख २१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यावेळी पाटील यांच्या घराशेजारी असलेले नातेवाईक कृष्णात गायकवाड हे पहाटेच्या सुमारास  उठले असता त्यांनी घराचा दरवाजा उघडला असल्याचे पाहिले आणि घरात गेले आणि घरातील लोकांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते गुंगीत होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर पाटील आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने शिरोली  पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. या प्रकरणी वैभव बाळासो पाटील यांनी शिरोली  पोलिस ठाण्यात  चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.