महसूल अधिकाऱ्यांवरील एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरूच...
कोल्हापूर - नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि चार तलाठ्यांचे निलंबन केले आहे. या एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ गेल्या तीन दिवसांपासून पुणे विभागातील महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील महसूल कार्यालयात शुकशुकाट होता.
महसूल विभागाचा नवीन आकृतीबंध देखील तयार करण्यात आलेला नाहीय. त्यामुळे कर्मचारी भरती झाली नसल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून पुणे विभागातील महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी संपावर आहेत. आज तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील जवळपास एक हजार चारशे आठ अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी झाल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे यांनी सांगितले.
संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल कार्यालये ओस पडली आहेत. महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू असून यावर तोडगा निघाला नाही तर भविष्यात राज्यातील महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी संपावर जाणार आहे.