डोकं ठिकाणावर आहे का? : मंत्री गिरीश महाजन अधिकाऱ्यांवर संतापले
नाशिक – सध्या नाशिकमध्ये झाडं तोडण्यावरून वादाची ठिणगी पडली असताना झाडं लावण्यावरून मंत्री गिरीश महाजन हे नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संतापले आहेत.
पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी राज्य सरकारने नाशिकमध्ये 15 हजार देशी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेसाठी दक्षिण भारतातील राजमुद्री येथून वड, पिंपळ, निंब, जांभूळ, आंबा यांसारखी सुमारे 15 फूट उंचीची झाडे टप्प्याटप्प्याने नाशिकमध्ये आणली जात आहेत. स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी राजमुद्री येथे जाऊन या झाडांची निवड केली होती.
प्रत्यक्षात वृक्षलागवडीसाठी खोदण्यात आलेले खड्डे पाहून मंत्री महाजन संतापले. केवळ पाच बाय पाच फूट आकाराचे खड्डे खोदून त्यामध्ये वड-पिंपळासारखी मोठी देशी झाडे लावण्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना थेट फोनवर जाब विचारला. डोकं ठिकाणावर आहे का? तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? कॉम्प्युटर सायन्स करून झाडे लावायला कशाला आले इथे? कोणी ठेवले आहे तुम्हाला? तुम्ही पाच बाय पाचवर वडाचे आणि पिंपळाचे झाड लावत आहात का? मग इथे काय लावत आहात? झेंडूचे फुले लावत आहात का? देशी झाडे लावले तरी लिंबाचे झाड पाच बाय पाचवर येणार आहेत का? आपण करतोय काय हे आपल्याला कळत आहे का? मी आलो नसतो तर नुसतं नावाला झाडं लावली असती आणि आम्हाला शिव्या दिल्या असत्या. तुम्हाला कोण विचारणार आहे? तेराशे किलोमीटर वरून आम्ही झाडे इथ आणतोय ते याच्यासाठी आणतोय का? असे ताशेरे त्यांनी ओढले आहेत.