हिंगोली जिल्ह्यात १९ डिसेंबरची पर्यावरणीय जनसुनावणी पुढे ढकलली

<p>हिंगोली जिल्ह्यात १९ डिसेंबरची पर्यावरणीय जनसुनावणी पुढे ढकलली</p>

हिंगोली : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासंदर्भात हिंगोली जिल्ह्यात १९ डिसेंबर रोजी होणारी पर्यावरणीय जनसुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केलेल्या अलाइनमेंटमधील बदल हे यामागील मुख्य कारण असल्याचे समजते.

या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. कोणताही गृहपाठ न करता कर्ज काढून हा महामार्ग महाराष्ट्राच्या जनतेवर लादण्याचा प्रयत्न सरकारने केला, असा आरोप त्यांनी केला. सरकार या संपूर्ण प्रकरणात पुरते गोंधळलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

फोंडे म्हणाले की, शेतकऱ्यांनी गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने आंदोलन लावून धरले असून, सरकार कोणतीही चाणक्य नीती वापरून यावेळी शेतकऱ्यांना फसवू शकले नाही. दीड वर्षांच्या आंदोलनामुळे सरकारला हा प्रकल्प एक टक्काही पुढे नेता आलेला नाही. संयुक्त मोजणीही ९० टक्के गावांमध्ये शेतकऱ्यांनी उधळून लावली आहे.

हा संपूर्ण संघर्ष शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आणि आंदोलनाच्या यशाचे प्रतीक असल्याचेही फोंडे यांनी सांगितले.