"मला उमेदवारी द्या म्हणून भेटा, पण कुणाला उमेदवारी देऊ नका म्हणून भेटायला येऊ नका" – आमदार सतेज पाटील

<p>"मला उमेदवारी द्या म्हणून भेटा, पण कुणाला उमेदवारी देऊ नका म्हणून भेटायला येऊ नका" – आमदार सतेज पाटील</p>

कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून उमेदवारी न मिळाल्याने कोणीही नाराज होऊ नये, असे आवाहन विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते व जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले. उमेदवारी मिळो अथवा न मिळो, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर महानगरपालिकेत एकूण २० प्रभागांतून ८१ जागांसाठी निवडणूक होणार असून, यावेळी पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात एक ते दहा प्रभागांतील, तर दुसऱ्या टप्प्यात दहा ते वीस प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या.

या प्रक्रियेत तरुण, ज्येष्ठ तसेच महिलांची मोठी उपस्थिती होती. वीसही प्रभागांमधून सुमारे साडेतीनशे इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी नगरसेवक, तसेच डॉक्टर, वकील, अभियंते आणि उच्चशिक्षित इच्छुकांचा समावेश होता.

इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने सर्वांनाच उमेदवारी देता येणार नाही, मात्र उमेदवारी न मिळालेल्यांनी नाराज न होता पक्षाच्या उमेदवारासाठी काम करावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. “तुमच्यातीलच कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार आहे. मला उमेदवारी द्या म्हणून भेटा, पण कुणाला उमेदवारी देऊ नका म्हणून भेटायला येऊ नका,” असे सांगत त्यांनी “जास्तच नाराज झालात तर विधानसभेची उमेदवारी देतो,” असे मिश्कील विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस कमिटीच्या बैठकीत एकच हशा पिकला.