‘उपमुख्यमंत्री शिंदे हेच महाराष्ट्राचे पाब्लो एस्कोबार?’ — ‘तो हा नव्हेच’चा पोलिसांचा बनाव उघड : काँग्रेसचा आरोप
मुंबई : सातारा जिल्ह्यातील सावरी गावात सापडलेल्या ११५ कोटी रुपयांच्या ड्रग्ज साठ्याप्रकरणी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव थेट येत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पोलिसांकडून ‘तो हा नव्हेच’ असा बनाव रचण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला.
काँग्रेस पक्षाकडून गेल्या काही दिवसांत या ड्रग्ज प्रकरणाबाबत विविध बाबी समोर आणण्यात आल्या असून, ज्या रिसॉर्टमध्ये हे ड्रग्स प्रकरण उघडकीस आले, तो रिसॉर्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाचा असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. तसेच संबंधित वडिलोपार्जित जमिनीच्या सातबाऱ्यावर एकनाथ शिंदे आणि प्रकाश शिंदे, दोघांचीही नावे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, कारवाई करण्यात आलेला प्रकाश शिंदे हा वेगळाच व्यक्ती असल्याचे पोलिस सांगत असल्याने हा केवळ योगायोग मानायचा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“या संपूर्ण प्रकरणात सरळ सरळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव येत आहे. महाराष्ट्रातील युवकांना ड्रग्सच्या नशेत बुडवण्यामागे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा हात तर नाही ना? युवकांना ड्रग्जच्या नादी लावून कमावलेल्या पैशांतून त्यांच्या पक्षाचा कारभार चालवला जातो का?” असे गंभीर प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केले.
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढे येऊन महाराष्ट्रातील नागरिकांना स्पष्ट आणि ठोस स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली आहे.