कबनूर-रुई रस्त्यावरील लॉजमध्ये वेश्या व्यवसाय...चौघांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी – रूई - कबनूर रस्त्यावर हेरिटेज लॉजिंग अँड फार्म हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रूई ते कबनूर रस्त्यावर हेरिटेज लॉजिंग अँड फार्म हाऊस आहे. याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले. त्यावेळी या लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले.
अमित देमण्णा याच्या मालकीचे हे लॉजिंग असून त्याने ते संतोष पाटील याला चालवण्यास दिले आहे. पाटील हा याठिकाणी बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती समोर आली. यावेळी पोलिसांना दोन महिलाही आढळून आल्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एजंट पंकज चव्हाण, लॉज चालक संतोष पाटील, व्यवस्थापक नेमिनाथ आवटे, मूळ मालक अमित देमण्णा यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.