राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मागणी अर्जास प्रारंभ

<p>राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मागणी अर्जास प्रारंभ</p>

कोल्हापूर – निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेतून राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका अधिकृतपणे जाहीर केल्या. त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचाही समावेश आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारी मागणी अर्ज प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. १५ डिसेंबर रोजी अयोध्या टॉवर येथे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक संपन्न झाली. बैठकीस शहराध्यक्ष आर. के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, महिला अध्यक्ष पद्मजा तिवले, कोल्हापूर उत्तर विधानसभा अध्यक्ष गणेश जाधव, प्रदेश प्रतिनिधी निरंजन कदम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांचा कल लक्षात घेता १७ डिसेंबरपासून उमेदवारी मागणी अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

उमेदवारी अर्ज स्वीकारणे तसेच त्यासंदर्भातील कायदेशीर बाबींची जबाबदारी गणेश जाधव व ॲड. अनिल घाटगे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शिवाजी स्टेडियम, गाळा क्रमांक १, राष्ट्रवादी कार्यालय येथे उमेदवारी मागणी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज प्रदेश कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आले असून, पक्षाच्या वतीने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी निर्धारित कालावधीत अर्ज भरून सादर करावेत, असे आवाहन शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी केले आहे.

दरम्यान, उमेदवारीचे छापील अर्ज कार्यालयात उपलब्ध असून कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागणी अर्ज भरून पक्षास सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर उत्तर विधानसभा अध्यक्ष गणेश जाधव यांनी केले आहे.