ज्येष्ठ पत्रकार, संपादक व साहित्यिक सुनीलकुमार सरनाईक यांचे निधन

<p>ज्येष्ठ पत्रकार, संपादक व साहित्यिक सुनीलकुमार सरनाईक यांचे निधन</p>

कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक व सामाजिक कार्यकर्ते सुनीलकुमार वसंतराव सरनाईक यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुनीलकुमार सरनाईक यांनी गेली चार दशके पत्रकारिता, संपादन आणि लेखन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. दैनिक सकाळ, पुढारी, लोकमत, पुण्यनगरी, तरुण भारत, सत्यवादी आदी नामांकित वृत्तपत्रांतून त्यांचे सातत्यपूर्ण लेखन प्रसिद्ध झाले होते. ‘ग्राहक जागर’, ‘नोट’, ‘पाऊलखुणा’, ‘संगीतसूर्य’ यांसारख्या सदरांमुळे ते वाचकप्रिय झाले.

पत्रकारितेबरोबरच त्यांनी साहित्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. जोतिबा : परिचय व नित्यक्रम, माणसं मनातली, रोखठोक, जोतिबा : एक लोकदैवत, ग्राहक जागर, स्मरणगाथा यांसारखी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

ते करवीर काशी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष होते. तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी अतिथी व्याख्याते म्हणूनही त्यांनी मार्गदर्शन केले.

त्यांच्या निधनाने पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रात एक अभ्यासू, निर्भीड आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विविध क्षेत्रांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.