मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी घाईगडबडीने रस्त्याचे पंचवर्क... 

खडीमुळे दुचाकी घसरून तिघे गंभीर जखमी

<p>मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी घाईगडबडीने रस्त्याचे पंचवर्क... </p>

इचलकरंजी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या इचलकरंजी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही दिवसांपासून रस्त्यांच्या दुरूस्तीची कामी हाती घेतली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांचे पंचवर्क करून त्यावर खडी पसरण्यात आली आहे. मात्र घाईगडबडीत केलेली ही कामे अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहेत.

रविवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानकाकडून हुलगेश्वरीकडे जात असताना एका दुचाकीचा अपघात झाला. घरगुती कार्यक्रम आटोपून मोहन सोनार हे कुटुंबासह दुचाकीवरून घरी जात होते. मात्र रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे त्यांची दुचाकी घसरली. यात सोनार यांच्यासह त्यांची बहीण बसव्वा गंगापुरे आणि सात वर्षाचा भाचा नकुल हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर आयजीएम रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुख्यमंत्री येणार म्हणून केवळ दिखावा करण्यासाठी पंचवर्क न करता संपूर्ण रस्त्याचं दर्जेदार काम करावे, या अपघात प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावे  आणि धोकादायक खडी तात्काळ हटवून रस्ते सुरक्षित करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.