आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत, असे मी म्हणणार नाही पण...: मुख्यमंत्री 

<p>आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत, असे मी म्हणणार नाही पण...: मुख्यमंत्री </p>

नागपूर -  आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत, असे मी म्हणणार नाही. पण मी एवढं निश्चित सांगतो, देशातील मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थांचा विचार केला तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आजच्या हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, 2047 चा विकसित महाराष्ट्र कसा असेल याचा रोडमॅप आपण तयार केला आहे. 2030 चा पहिला टप्पा, 2035 चा दुसरा टप्पा आणि 2047 चा तिसरा टप्पा आहे. मला विश्वास आहे की, 2029 ते 2030 दरम्यान महाराष्ट्र हा देशातील पहिली एक ट्रिलिनय डॉलर्सची अर्थव्यवस्था असेल. राज्यातील विकासासाठी कर्ज उभारावे लागते. प्रत्येक राज्य ते कर्ज उभारते. त्यामध्ये रिर्झव्ह बँकेने आणि एफआरबीएमने आपल्याला राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 25 टक्के कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे. त्याच्यावर आपण गेलो तर अर्थव्यवस्था अडचणीत आली, असा त्याचा अर्थ होतो. आपण 2025-26 चे अर्थसंकल्पीय अंदाज आणि आतापर्यंत घेतलेल्या कर्जाचा विचार केला तर आपण एकूण स्थूल उत्पन्नाच्या 18.87 टक्के एवढे कर्ज घेतले आहे. 25 टक्क्याच्या मर्यादेपासून आपण पुष्कळ दूर आहोत. देशात अशी फक्त तीन राज्यं आहे, ज्यांचं हे दायित्व 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे, यामध्ये गुजरात, महाराष्ट्र आणि ओरिसा यांचा समावेश आहे.