कसबा बावड्यात दोन दिवसांचे मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित
कोल्हापूर : कसबा बावड्यातील सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव आणि पत्नी वैशाली जाधव यांच्या सहकार्यातून पद्मा पथक येथे दोन दिवसांचे मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून सुमारे ५०० रुग्णांना मोफत डोळे तपासणी तसेच चष्म्याचा लाभ मिळणार असून, यामध्ये जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचा मोठा सहभाग आहे.
बंडू जाधव आणि वैशाली जाधव हे दाम्पत्य वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत असते. वाढत्या वयासोबत आरोग्य तपासणीची गरज वाढत असतानाच आर्थिक अडचणींमुळे अनेक गोरगरीब नागरिकांना वेळेवर तपासणी करणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी हे मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप शिबीर आयोजित केले आहे.
या शिबिराच्या पहिल्या दिवशी सुमारे २०० रुग्णांनी लाभ घेतला असून, उद्यापर्यंत सुमारे ५०० रुग्ण शिबिराचा लाभ घेणार आहेत. विशेष म्हणजे या शिबिरात जेष्ठ नागरिकांसह दिव्यांगांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आहे.
आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक घरातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी असे सामाजिक उपक्रम पुढेही राबवणार असल्याचा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या वैशाली जाधव यांनी व्यक्त केला.
यावेळी उज्वला चौगले, सुनील निकम, महम्मद शेख, धनाजी तोरस्कर, मनोज डोंगरे, श्रीपाद कुलकर्णी, माधवी लोणार, सुजाता कुलकर्णी, मंगल देशपांडे, श्रीकांत चव्हाण, योगेश निकम यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.