निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणूक–2025 च्या तयारीचा भाग म्हणून सात निवडणूक निर्णय अधिकारी (R.O. व A.R.O.) यांच्या कार्यालयांसाठी आवश्यक असणाऱ्या जागांची आज अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी पाहणी केली.
या पाहणीदरम्यान निवडणूक कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा, उपलब्ध जागा, तांत्रिक बाबी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांनी हॉकी स्टेडियम, राजोपाध्येनगर बॅडमिंटन हॉल, दुधाळी मैदान, गांधी मैदान, शेठ रुईया विद्यालय, छत्रपती शिवाजी मार्केट येथील पाणीपुरवठा विभाग तसेच एलबीटी कार्यालय या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये स्थापन करण्यासाठी आवश्यक जागा, सोयीसुविधा आणि व्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी जल अभियंता हर्षजीत घाटगे, निवडणूक अधिक्षक सुधाकर चल्लावाड, कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.