...अन्यथा भटकी कुत्री महापालिका चौकात सोडू :  काँग्रेसचा इशारा

<p>...अन्यथा भटकी कुत्री महापालिका चौकात सोडू :  काँग्रेसचा इशारा</p>

कोल्हापूर - शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढती आहे. भटक्या कुत्र्यांमुळे शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. अनेकांनी तर सुरक्षिततेच्या कारणामुळे सकाळी फिरायला जाणेही बंद केले आहे. निर्बीजीकरण मोहीम मंद गतीने सुरू असल्याने शहरात कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याने आज काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांची भेट घेतली.

भटक्या प्राण्यांबद्दल सहानुभूती असली तरी, नागरिकांची सुरक्षा ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील तीन महिन्यांत शहरातील सर्व भटकी कुत्री निवारागृहात हलवावीत, निर्बीजीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, रेबीज लसीचा पुरेसा साठा ठेवावा, अशा मागण्यांचे निवेदन अतिरिक्त आयुक्त दरेकर यांना सादर करण्यात आले.

यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा, अन्यथा शहरातील सर्व भटकी कुत्री गोळा करून थेट महापालिका चौकात सोडू, असा इशारा दिला आहे.

यावेळी माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी नगरसेविका उमा बनछोडे, माधुरी लाड, भारती पोवार, सरलाताई पाटील, वैशाली महाडिक, उज्वला चौगुले, वहिदा सौदागर, रोहिणी साळोखे, स्नेहलता उलपे, विद्या निंबाळकर, सुमन ढेरे, दीपाली देशिंगकर, अर्चना बिरांजे, संगीता चक्रे, वैशाली जाधव यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.