धक्कादायक ! : कोल्हापुरातील भाजपच्या जिल्हा सरचिटणीसाचा आत्महत्येचा प्रयत्न...
कोल्हापूर - गुंतवणूकदारांचे पैसे वेळेत देता न आल्याने तसेच वारंवार पैशाच्या तगाद्याला वैतागून कोल्हापूर शहरातील भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजू मोरे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फुलेवाडी येथील एका पतसंस्थेमध्ये मोरे हे गुंतवणूकदाराकडून भिशी गोळा करत होते. वर्षाला 24% व्याजदर देण्याचं लोकांना आमिष दाखवून ते भिशी गोळा करत होते. अनेक गुंतवणूकदारांनी या ठिकाणी पैसे गुंतवले होते. या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी पैसे गुंतवल्याने हे पैसे वेळेत मिळावेत अशी मागणी गुंतवणूकदारांनी मोरे यांच्याकडे केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत ही भिशी परत मिळत नसल्याने गुंतवणूकदार मोरे यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करू लागले. त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांना 10 डिसेंबर रोजी पैसे देतो असे सांगून कार्यालयाजवळ बोलवण्यात आले होते. त्यानुसार सर्व गुंतवणूकदारांनी मोरेंच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली. यावेळी गुंतवणूकदारांनी गोंधळ घातल्यानंतर मोरे यांनी विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केला.