दोघा घरफोड्यांकडून ४३ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
शहापूर पोलीसांची कारवाई
कोल्हापूर - एक डिसेंबरला निमशिरगावमधील हरि चोपडे यांचे घर अज्ञातांनी फोडले होते. चोपडे यांनी शहापूर पोलिसांत याबाबत फिर्याद दाखल केली होती. शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने या घरफोडीचा तपास करताना चोरीचे दागिने विक्रीसाठी आलेल्या प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने या दोघांना यड्रावमधून ताब्यात घेतले आहे. बेरोजगार असलेल्या या दोघांनी शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिलीय. दोघांकडून घरफोडीचे नऊ गुन्हे उघडकीला आणण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्या कडून ५३ लाख ७४ हजार रुपये किमतीचे ४३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.
चोरीचे दागिने खरेदी करणारे सराफ आणि एजंट यांची माहिती घेण्याचे काम सुरू असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
यावेळी नऊ गुन्ह्यांची उकल करणाऱ्या शहापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या पत्रकार बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते.