आपला दवाखाना योजनेबाबत विधानपरिषदेत आ. सतेज पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न...
नागपूर - राज्यात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धिनी केंद्र योजनेंतर्गत सुरु असलेल्या दवाखान्यात फॉर्मसी पदवीधारकांच्या कमरतेमुळे रुग्णांना औषधे देणे अडचणीचे ठरत आहे. यापैकी अनेक दवाखाने बंद आहेत याकडे आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य आमदारांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करून लक्ष वेधले. ही योजना प्रत्यक्षात पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी तसंच बंद दवाखाने पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने फॉर्मसी पदवीधारकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
यावर खुलासा करताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यक्रम केंद्र शासनाच्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या मार्गदर्शक सुचनेनुसारच कार्यान्वित करण्यात आला असल्याचे सांगितले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनां नुसार दोन्ही प्रकारच्या दवाखान्यांमध्ये फार्मसी पदवीधर किंवा पदवीधारक यांची पदे मंजूर नाहीत या आरोग्य संस्थांच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या स्टाफ नर्सच्याद्वारेच रुग्णांना औषधे देणे अपेक्षित असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले. या दवाखान्यांमध्ये औषधे देण्यासाठी स्टाफ नर्स उपलब्ध असून कोणताही दवाखाना बंद असल्याचे निदर्शनाला आलेले नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.