राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या दिव्या पाटीलची सुवर्ण कामगिरी

<p>राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या दिव्या पाटीलची सुवर्ण कामगिरी</p>

बेंगळुरू : ग्रीनवूड हाय इंटरनॅशनल स्कूल, बेंगळुरू येथे भारतीय शालेय क्रीडा महासंघातर्फे आयोजित १९ वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अपराजित राहून सुवर्णपदकावर कब्जा केला. कोल्हापूरच्या दिव्या पाटील हिने तिसऱ्या पटावर प्रभावी खेळ करत सहा पैकी साडेपाच गुणांची कमाई करून वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले.

देशभरातील ३२ संघांमध्ये स्विस लीग पद्धतीने झालेल्या सहा फेऱ्यांत महाराष्ट्राने सर्वच सामने जिंकत २४ पैकी २० गुण मिळविले. पहिल्या फेरीत गुजरातवर ४–०, दुसऱ्या फेरीत IPSC वर ३.५–०.५, तिसऱ्या फेरीत केरळवर ४–०, तर महत्त्वाच्या चौथ्या फेरीत अग्रमानांकित CBSE संघावर ३.५–०.५ असा विजय मिळवत आघाडी मजबूत ठेवली. पाचव्या फेरीत तामिळनाडूवर २.५–१.५ अशी मात केली तर अंतिम फेरीत कर्नाटकचा ३.५–०.५ असा पराभव करून महाराष्ट्राने अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.

महाराष्ट्राच्या विजयी संघात दिव्या पाटील (कोल्हापूर), श्रावणी उंडाळे (पुणे), अनुष्का कुतवळ (पुणे), श्रुती काळे (छ. संभाजीनगर) आणि देवांशी गावंडे (अकोला) यांचा समावेश होता. दिव्या आणि अनुष्का यांनी प्रत्येकी साडेपाच गुण मिळवून संघाच्या विजयानंतर सिंहाचा वाटा उचलला.

दिव्या पाटील ही जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिक्षण घेत असून यापूर्वीही दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिले आहे. तिच्या कामगिरीत प्राचार्या सौ. स्मिता पाटील, क्रीडा शिक्षक राहुल सरडे, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, सचिव व फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर तसेच प्रशिक्षक रोहित पोळ, उत्कर्ष लोमटे आणि सुमुख गायकवाड यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे.