सीपीआरमधील बिल मंजूरी प्रक्रियेत भ्रष्टाचार कारवाईची शिवसेना ठाकरे गटाची मागणी
कोल्हापूर - सीपीआर रुग्णालयात शासकीय अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मेडिकल बिलांच्या फाईल्स मंजूर करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. ८ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या पाहणीत 'फाईल नंबर ३' निदर्शनास आली. या फाईलमध्ये किती रक्कम कोणत्या अधिकाऱ्यांना देण्यात आलीय. याची नोंद असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. ही हिशेब फाईल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या मार्फत सिल करण्यास भाग पाडण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्य समिती नेमावी, निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा सरकारी वकील यांच्या मार्फत खातेनिहाय तपास करावा, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, तसेच या गैरव्यवहाराबाबत आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या पक्षाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले आहे.
हा कथित भ्रष्टाचार डॉ. सुप्रिया देशमुख यांच्या कार्यकाळात झाल्याचा आरोप करून त्यांच्या सर्व व्यवहारांची आणि मालमत्तेची अँटी करप्शन विभागाकडून चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी उपनेते संजय पवार यांनी केली आहे.
दरम्यान, सीपीआर प्रवेशद्वारावर सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली असून अभ्यागतांना आत सोडले जात नसल्याने वादावादी होताना दिसून येते. यावर बोलताना इमारती सुंदर न करता आतली यंत्रणा सुरळीत करा, अशी मागणी पवार यांनी केली.
यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.