महाराणी ताराबाई यांचा अभ्यासकांनी साक्षेपी अभ्यास करावा :  डॉ. जयसिंगराव पवार

 

शिवाजी विद्यापीठात चर्चासत्र

<p>महाराणी ताराबाई यांचा अभ्यासकांनी साक्षेपी अभ्यास करावा :  डॉ. जयसिंगराव पवार</p>

<p> </p>

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी मोठा तात्त्विक लढा उभारला. अशा महाराणीचा इतिहासकार आणि अभ्यासकांनी साक्षेपी अभ्यास करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले.

महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंतीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात "महाराणी ताराबाई आणि अठरावे शतक : एक ऐतिहासिक दृष्टिक्षेप" या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी, महाराणी ताराबाई या कर्तबगार आणि पराक्रमी होत्या. तरीही गेल्या सव्वाशे वर्षांत मराठा इतिहासाविषयी जो अभ्यास झाला, त्यामध्ये त्यांची खूपच उपेक्षा झाली. या कालखंडात अनेकांनी शिवचरित्रे लिहिली, पेशव्यांचे चरित्र लिहिले, मात्र ताराबाईंविषयी फारसे कुणाला लिहावंसे वाटले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

इतिहासकारांनी संभाजी महाराजांना बदफैली आणि राजाराम महाराजांना दुबळा ठरवले आणि थेट बाळाजी विश्वनाथाच्या चरित्राला हात घातला. गुरूवर्य वा. सी. बेंद्रे आणि शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू तथा ज्येष्ठ इतिहासकार डॉ. आप्पासाहेब पवार यांनी ताराराणींच्या इतिहास लेखना विषयी काम केले. त्यामधून ताराबाईंचा वस्तुनिष्ठ इतिहास जगासमोर आणता आला आणि उपेक्षेच्या छायेतून त्यांना बाहेर काढता आले असे डॉ. पवार यांनी सांगितले. नव्या संशोधकांनी अद्यापही अज्ञात असणारे महाराराणी ताराराणींच्या चरित्राचे पैलू लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

 अध्यक्षीय मनोगतात अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी, महाराणी ताराबाई यांनी एकाच वेळी मोगलांसारखे शत्रू, स्वकीय आणि पेशवे असा त्रिस्तरीय संघर्ष केला. त्याविषयी अधिक चिकित्सक अंगाने मांडणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉ. भारती पाटील, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. अवनीश पाटील, अरुण शिंदे, सुरेश शिपूरकर, बाळ पाटणकर, भारतभूषण माळी, विजय चोरमारे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, सुरेश शिखरे, दत्ता मचाले, उमाकांत हत्तीकट यांच्यासह इतिहासाचे अभ्यासक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.