कोल्हापूरचा अभिमान...!अजित नलवडे महाराष्ट्र पोलिस दलाच्या हॉकी संघाचे कर्णधार
कोल्हापूर - राज्य राखीव पोलिस दल, कोल्हापूर येथे हवालदार म्हणून कार्यरत असलेले तसेच लाईन बाजार, कसबा बावडा येथील रहिवासी हॉकीपटू अजित विष्णू नलवडे यांची महाराष्ट्र पोलीस दलाच्या हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. सध्या हा संघ ऑल इंडिया पोलीस दल हॉकी संघ स्पर्धेत सहभागी होत असून स्पर्धा राजकोट, गुजरात येथे सुरू आहे.
या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांच्या पोलिस दलांसह प्यारा मिलिटरी, बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी अशा नामांकित 30 हून अधिक संघांचा सहभाग आहे. पोलिस विभागातील ही स्पर्धा सर्वात सर्वोच्च दर्जाची मानली जाते.
अजित नलवडेंनी शालेय जीवनापासूनच हॉकी खेळाला सुरुवात केली. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्यांनी
डी. वाय. पाटील कॉलेज, महावीर कॉलेज तसेच शिवाजी विद्यापीठ संघाकडून अनेक स्पर्धांत उल्लेखनीय कामगिरी केली.
त्यांच्या खेळातील प्राविण्यामुळे त्यांची राज्य राखीव पोलीस दल, महाराष्ट्र येथे निवड झाली. 2010 पासून ते आरपीएफ संघाचा महत्वाचा भाग आहेत. यापूर्वी ते राज्य राखीव पोलिस दलाच्या हॉकी संघाचे कर्णधार म्हणूनही कार्यरत होते.
त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावरच त्यांची महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुख्य हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
अजित नलवडे यांच्या निवडीमुळे कोल्हापूरच्या क्रीडा विश्वात उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दलाचा संघ उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या यशामागे राज्य राखीव पोलीस दल बटालियनचे कमांडंट डॉ. प्रशांत अमृतकर, महाराष्ट्र पोलीस दलाचे क्रीडा प्रमुख एपीआय संतोष कांबळे, मार्गदर्शक व प्रशिक्षक तुषार कांबळे, झाकीर किल्लेदार, तसेच वडील, निवृत्त सहाय्यक फौजदार विष्णू नलवडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.