कोडोलीतील महावितरण कंपनीचा गलथान कारभार...
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील अंबाई कॉलनी जवळ अगदी रस्त्याच्या कडेला विजेचा खांब आहे. या खांबावरील फ्युज बॉक्स हा पूर्णपणे उघडा असून फ्युज बॉक्सची अवस्था अत्यंत दयनीय झालीय. त्या पेटीत विद्युत प्रवाह सुरू असलेल्या विद्युत वाहिन्या खुल्यापणाने लोंबकळत आहेत. या रस्त्यावरून वाहनांच्या बरोबर चालत येणाऱ्या शाळकरी मुलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा फ्यूज बॉक्स स्थलांतरित करावा किंवा तो सुरक्षित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
कुमार विद्या मंदिर जवळ असलेल्या विजेच्या खांबाला तर अतिक्रमणधारकांनी अक्षरशः विळखा घालून तो खांब रस्त्याकडेला असलेल्या खोक्यामध्ये अंतर्भूत केलाय. या ठिकाणी जर काही विद्युत अपघात घडला तर येथे असलेल्या पत्र्याच्या खोक्यांमध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित होणार आहे आणि एखादा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने याबाबत लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.