चोरट्यांचा प्रताप... पाणी पुरवठा संस्थांना ताप

इरिगेशन फेडरेशनचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या...

<p>चोरट्यांचा प्रताप... पाणी पुरवठा संस्थांना ताप</p>

कोल्हापूर - गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या ट्रॉन्सफार्मरमधील साहित्य चोरीच्या घटना वाढत आहेत. भोगावती, लक्ष्मी, वारणा तळसंदे, तळसंदे पारगाव, जोतिर्लिंग, विठ्ठल, गणेश, केदारलिंग, अन्नपूर्णा, बापूसाहेब जमदाडे जयभवानी यांसह अनेक पाणी पुरवठा संस्थांच्या ट्रान्सफार्मरमधील साहित्यांची चोरी झाली आहे. गंभीर बाब म्हणजे या सहकारी संस्थांच्या ट्रान्सफार्मरमधील साहित्यांची चोरी होत असताना शेजारी असलेले महावितरणचे ट्रान्सफॉर्मर मात्र 'अबाधित' राहतायत याबद्दल शेतकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त होतं आहे. चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनासह मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधूनही या घटना रोखण्याच्या दृष्टीने कोणतीच कार्यवाही झालेली नाही, तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या शेतकरी आणि संस्थांच्या प्रतिनिधींना योग्य प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप इरिगेशन फेडरेशनच्यावतीने करण्यात आलाय. त्यामुळे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आज फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 सततच्या चोऱ्यांमुळे पाणी पुरवठा संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत. या संस्थांना राज्य शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी फेडरेशनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी केली. पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांना सोलर प्रकल्पाची सक्ती करण्यात येतीय. मात्र सोलर प्रकल्पांचा खर्च परवडणारा नसल्याने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी फेडरेशनचे उपाध्यक्ष, माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी केलीय.

यावेळी भारत पाटील-भुयेकर, राजेंद्र सुर्यवंशी, सुभाष शहापुरे, सखाराम चव्हाण, बाबासाहेब देवकर, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, संजय पाटील, बाहबली पाटील, सचिन जमदाडे यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.