आ.राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयाजवळ वंचितचे खर्डा भाकरी खाऊन आंदोलन...
कोल्हापूर - राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन महायुती सरकारने पाळावे आणि सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. याचबरोबर केंद्र सरकारने लागू केलेले नवीन चार कामगार कायदे रद्द करण्यात यावेत, यासाठी आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयाजवळ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सर्व कार्यकर्ते एकत्र येत असताना पोलिसांनी त्यांना सोन्या मारुती चौक परिसरातच रोखले.
यावेळी आंदोलकांनी रस्त्यात ठिय्या मारून खर्डा भाकरी खाऊन आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या मागण्यां संदर्भात आमदार राजेश क्षीरसागर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.
या आंदोलनात युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, संभाजी कागलकर, दीपक कुरणे, रघुनाथ कांबळे, देवेंद्र कांबळे, अर्जुन वाघमारे, गणेश कुचेकर, महादेव कांबळे, फर्जना नदाफ, सलमा मेमन, कल्पना शेंडगे, नजमा मोकाशी, ज्योती माने, संगीता थोरात आदींनी सहभाग घेतला.