अन्न आणि औषध प्रशासनाने खादयपदार्थाचे १३० नमुने तपासणीसाठी पाठवले

 

नमुने घेतले... कारवाई कधी ?

<p>अन्न आणि औषध प्रशासनाने खादयपदार्थाचे १३० नमुने तपासणीसाठी पाठवले</p>

<p> </p>

कोल्हापूर - सणासुदीच्या काळात मिठाई, खाद्य तेल, तूप, फराळ आणि गोड पदार्थांची मागणी वाढत आहे. या काळात दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खवा यामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने सणासुदीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवायला सुरुवात केली आहे.

२५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत 'सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा' या नावाने विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत नमुने गोळा कारण्यासोबत नागरिकांना प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमांतून मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या मोहिमेअंतर्गत ११ ऑगस्ट २०२५ ते १० ऑक्टोबर पर्यंत १३५ दुकानांची तपासणी करून विविध खाद्यपदार्थांचे १३० नमुने घेतले आहेत. हे नमुने पुणे आणि मुंबईतील प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. १३५ दुकानांची तपासणी करून, त्यापैकी सहा व्यावसायिकांकडील, खाद्यतेल गूळ, ड्रायफ्रूट, तूप, खवा असा एकूण चार लाख ९० हजार रुपये किंमतीचा ३ हजार ४२० किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. या जप्त केलेल्या खादयपदार्थाचेही नमुने पुणे आणि मुंबईतील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आले आहे. मात्र त्याचा अहवाल येण्यास किमान तीन महिन्याचा कालावधी लागतो. हा अहवाल आल्यानंतरच त्या व्यावसायिकांवर ठोस अशी कारवाई विभागाला करता येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त विभाग प्रदीपा फावडे यांनी सांगितले आहे.

दिवाळी सणाच्या निमित्ताने अनेक जण मिठाई त्याचबरोबर खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थांची खरेदी करत असतात. मात्र यातील भेसळ रोखण्याचे आव्हान अन्न आणि औषध प्रशासनासमोर आहे. त्यासाठी तिघा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांच्या सोबत इतर कर्मचाऱ्यांचे तपासणी पथक काम करत आहे. संशयास्पद वाटणाऱ्या खाद्यपदार्थांचे नमूने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येत आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारवाई करता येणार आहे त्यामुळे सद्या तरी केवळ नमुने घेण्याचे काम या विभागाकडून करण्यात येतं आहे.