आमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान; राज्याच्या समृद्धीसाठी साकडं

<p>आमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान; राज्याच्या समृद्धीसाठी साकडं</p>

कोल्हापूर : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या 'यशवंत निवास' येथेही मंगलमय वातावरणात श्री गणेशाची प्रतिष्ठापना पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि साधेपणाने, गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी पाटील कुटुंबीयांनी मनोभावे पूजा व आरती केली. आमदार सतेज पाटील यांनी यावेळी गणरायाच्या चरणी साकडं घालत, "गणरायाने संपूर्ण राज्यातील जनतेला आनंद, समाधान आणि समृद्धी लाभू दे. सर्वांची विघ्नं दूर करू दे." अशी प्रार्थना केली.

गणपती बाप्पाचं आगमन होताच घरात उत्साह, भक्तिभाव आणि पारंपरिकतेचा संगम दिसून आला. सकाळपासूनच परिसरात गणेश आगमनाची लगबग सुरू होती. पारंपरिक पूजाविधीसह, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यांनी यानिमित्ताने राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील,  वैजयंती संजय पाटील, शांतादेवी डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज संजय पाटील व वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील, देवश्री सतेज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय उपस्थित होते.