गणेशोत्सव पूर्वसंध्येला शहरात पोलीस संचलन; दंगल काबू पथकाची प्रात्यक्षिके सादर

<p>गणेशोत्सव पूर्वसंध्येला शहरात पोलीस संचलन; दंगल काबू पथकाची प्रात्यक्षिके सादर</p>

कोल्हापूर - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून शिस्तबद्ध रूट मार्च अर्थात संचलनाचं आयोजन करण्यात आलं. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी हे संचलन शहराच्या मुख्य रस्त्यांवरून पार पडले.

गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. शहरातील विविध गणेश मंडळांशी नियमित समन्वय साधण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात विशेष अधिकारी नेमले गेले आहेत. गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला, मिरजकर तिकटी येथून सुरू झालेलं पोलीस संचलन खरी कॉर्नर, बिनकांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, महापालिका, आणि शिवाजी महाराज चौक मार्गे पार पडलं. या संचलनादरम्यान दंगल काबू पथकाच्या प्रात्यक्षिकांनी विशेष लक्ष वेधलं. प्रशिक्षित जवानांनी गर्दी नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि त्वरित प्रतिसाद या बाबतीत केलेल्या सादरीकरणाचे नागरिकांनी कौतुक केलं.

या संचलनात अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, संजीवकुमार झाडे, श्रीराम कन्हेरकर, संतोष डोके, सुशांत चव्हाण, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.