श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचा गणेश आगमन सोहळा उत्साहात पार पडला

<p>श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचा गणेश आगमन सोहळा उत्साहात पार पडला</p>

कोल्हापूर : श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या गणेश मूर्तीची भव्य आगमन मिरवणूक गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला पारंपरिक ढोल-ताशा आणि भक्तांच्या जयघोषात उत्साहात पार पडली. पापाची तिकटी चौकातून सुरू झालेल्या या मिरवणुकीत लहान मुलांच्या लेझीम पथकाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!" च्या जयघोषात संपूर्ण परिसर गणेशमय झाला होता. या मिरवणुकीत शेकडो गणेशभक्त सहभागी झाले होते. अबालवृद्ध, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. गेल्या १३५ वर्षांपासून श्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या परंपरेला यंदाही उत्साहाचा नवा उमाळा लाभला. मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध आणि देखण्या पद्धतीने पार पडली.