कोल्हापुरात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

<p>कोल्हापुरात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन</p>

कोल्हापूर - राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी दरवर्षी २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यंदाही या दिवसाचं औचित्य साधून कोल्हापूरमध्ये क्रीडा रॅली, चर्चासत्र, सत्कार समारंभ आणि स्पोर्ट्स सायन्स सेंटरच्या उद्घाटनासारखे उपक्रम राबवले जाणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं २९ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राष्ट्रीय क्रीडा दिनाचं आयोजन करण्यात आलंय. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता भवानी मंडप येथे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याचं पूजन होणारय. त्यानंतर क्रीडा ज्योत रॅली व सायकल रॅली भवानी मंडप ते मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमपर्यंत काढण्यात येणारय. यानंतर सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते स्टेडियममध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन शपथ व घोषणा दिली जाणारय. तसेच वर्ष २०२४-२५ मधील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडूंना गौरविण्यात येणार असून जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेचे उद्घाटन देखील होणारय.

याच दिवशी महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर येथे सकाळी ११.३० वाजता क्रीडा शिक्षकांसाठी डोपिंगविषयी जागरूकता व चर्चासत्र आयोजित करण्यात आलंय. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय मैदानी क्रीडा मार्गदर्शक सुभाष पवार मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.३० वाजता विभागीय क्रीडा संकुलात, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते स्पोर्ट्स सायन्स सेंटरचे उद्घाटन होणार आहे. या सर्व उपक्रमांना कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, क्रीडा संस्था आणि खेळाड्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती विद्या शिरस यांनी केलं आहे.