कर्जमाफीसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

<p>कर्जमाफीसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन</p>

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत संवाद साधला. निवेदनात मुख्यतः शेतकरी कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, कागल–पुणे महामार्गावरील टोल बंद करा, एफ. आर. पी. चा तुकडा नको, एकरकमी एफ.आर.पी. द्या, आणि जिल्हा परिषद शाळांसाठी निधी द्या, अशा मागण्या होत्या.

यावेळी अजित पवारांनी, " राज्यातील शेतकऱ्यांना 2017 आणि 2019 मध्ये कर्जमाफीच्या योजना जाहीर झाल्या, तरीही आत्महत्यांचे प्रमाण थांबलेले नाही. शेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी नवी कर्जमाफी योजना कशी असावी याचा अभ्यास करण्यासाठी समिती तयार करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार योग्य ती कायमस्वरूपी उपाययोजना करेल."

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोजणीस विरोध करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून शक्तीपीठ महामार्गावर अंतिम निर्णय घेतला जाईल,असे सांगितले.

कागल–पुणे महामार्गावरील खराब रस्त्यावर टोल आकारण्याबाबत, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा उल्लेख करत, "जे रस्ते निकृष्ट आहेत, तिथं टोल घेणं चुकीचं आहे," असं स्पष्ट मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

या शिष्टमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, धनाजी पाटील, डॉ. बाळासाहेब पाटील, राजाराम देसाई, बाजीराव पाटील, विशाल चौगुले, पंकज पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.