कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमधील दंगलीप्रकरणी पाच जणांना अटक

कोल्हापूर - शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राजेबाग स्वार दर्गा आणि सिद्धार्थनगर परिसरातील दोन गटात डिजिटल फलक आणि साऊंड सिस्टिम लावण्यावर राडा झाला होता. यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले होते. तर वाहनांची आणि दुकानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. काही वाहनं पेटवून देण्यात आली होती. शनिवारी दुपारी दोन्ही गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येत या वादावर पडदा टाकलाय. मात्र या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या सुमारे ४०० जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा तौसिफ शेख, निहाल शेख, सद्दाम महात, अशपाक नायकवडी, इकबाल सरकवास या पाच जणांना अटक केलीय. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना गुरूवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दंगलीतील दंगलखोरांचा शोध सुरू असून पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर हे अधिक तपास करत आहेत.