चंदगडच्या भाजप युवा नेत्यानं घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

कोल्हापूर - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना, चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे युवा नेते आणि विशेष कार्यकारणी सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी त्यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ही भेट तब्बल अर्धा तास झाली असून, यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार राजेश पाटील हे देखील उपस्थित होते. भेटीनंतर पक्षप्रवेशाबाबत चर्चा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी, संग्रामसिंह कुपेकर यांनी यास स्पष्ट नकार दिला आहे. अजित पवार आणि आमचे जुने संबंध आहेत. ही केवळ वैयक्तिक कामानिमित्त घेतलेली भेट होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, अजित पवार यांच्या उपस्थितीत आजच करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी उमेदवार राहुल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत.
कुपेकर यांचा राजकीय प्रवास आणि स्थानिक संघर्ष -
संग्रामसिंह कुपेकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सोडून भाजपमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. चंदगडमधील भाजपचे आमदार शिवाजी पाटील आणि कुपेकर यांच्यात गेल्या काही काळात शक्तिपीठ महामार्गाच्या आंदोलनावरून तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. कुपेकर हे माजी आमदार राजेश पाटील यांच्या सोबत महामार्ग विरोधात अग्रभागी असून, काही दिवसांपूर्वी आमदार शिवाजी पाटील यांनी महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. या मुद्द्यावरून दोघांनी एकमेकांना खुले आव्हान दिल्याने, भाजपच्या स्थानिक यंत्रणेत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर संग्रामसिंह कुपेकर यांची उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेली भेट फक्त वैयक्तिक की रणनीतीचा भाग?, यावर सध्या चर्चा रंगल्या आहेत.