आ.अशोकराव माने यांच्या संस्थेला दिलेल्या भूखंडाच्या विरोधात उद्या आंदोलनाची दिशा ठरणार...

कोल्हापूर - कोल्हापूर आणि सातारा ही दोन्ही जिल्हे मराठ्यांच्या राजधानीची ठिकाणे आहेत. या दोन्ही जिल्ह्यात ५० टक्क्यांहून अधिक मराठा समाज राहतोय मात्र या ठिकाणी मराठा भवन नाही याची उणीव वारंवार मराठा समाजाला भासतेय. यामुळे मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर शहरातील रिविजनल सर्वे नंबर ६७९ / ३ ही हॉकी स्टेडियम नजीकची सहा एकर जागा मराठा भवनसाठी देण्याची मागणी करण्यात आली होती.
याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय तसंच राज्याच्या महसूल विभागाकडे पाठवण्यात आला होता. यासाठी गेली १५ वर्षे सातत्यानं पाठपुरावा सुरु होता. सकल मराठा समाजाने याठिकाणी मराठा भवन उभारण्यासाठी देणगी स्वरुपात कोट्यवधी रुपयांचा निधीही गोळा केलाय. मात्र आमदार अशोकराव माने यांनी याच भूखंडाची मागणी त्यांच्या महिला औद्योगिक संस्थेसाठी केली. त्यानंतर शासनाने हा सुमारे १०० कोटींचा भुखंड संबंधित संस्थेला दिल्यानं सकल मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झालाय. मराठा स्वराज्य भवनसाठी मागणी केलेला भुखंड कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्यात आल्यानं याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. त्यामुळं या संदर्भात उद्या सोमवारी २५ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये सकल मराठा समाजाची व्यापक बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. मात्र, आमदार अशोकराव माने यांनी मोठ्या मनाने हा भूखंड मराठा स्वराज्य भवनसाठी द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रिविजनल सर्वे नंबर ६७९ / ३ हा भूखंड, शहरातील मोक्याच्या ठिकाणी आहे. आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला पर्यायी भूखंड उपलब्ध होऊ शकतो.. याशिवाय मराठा स्वराज्य भवन साठी, २०१५ मध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तर २०१६ मध्ये आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेनं भूखंड मागणीचा प्रस्ताव पाठवला. तरी देखिल कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता, थेट आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला हा सुमारे १०० कोटीचा भूखंड दिल्यानं, मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत.