जीएसटीच्या पाच आणि अठरा टक्के स्लॅबला मंत्रिगटाची मान्यता
दैनंदिन वापराच्या वस्तू होणार स्वस्त

कोल्हापूर - सध्या जीएसटीचे ५%, १२%, १८% आणि २८% असे ४ स्लॅब आहेत. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलताना यावर्षी दिवाळीत एक मोठी भेट मिळणार असून आम्ही पुढच्या पिढीतील जीएसटी सुधारणा आणत असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आज झालेल्या अर्थमंत्र्यांच्या गटाच्या बैठकीत वस्तू आणि सेवा कराचे दर तर्क संगत करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव स्वीकारण्यात आलाय. या बैठकीत टॅक्स स्लॅब कमी करून ५ टक्के आणि १८ टक्के करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावावर चर्चा झाली. याला मंत्रीगटाने सहमती दर्शवली तसंच काही राजकर्त्यांनी काही आक्षेप घेतले असून ते जीएसटी कौन्सिलकडे पाठवण्यात आलेत. मंत्रिगटाने पाठिंबा दिल्यामुळे जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक कदाचित सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०२५ मध्ये होईल. या बैठकीत या स्लॅबना मंजुरी मिळाली तर नवीन दर २०२६ च्या सुरुवातीला लागू होऊ शकतात.
या स्लॅबमुळे सुका मेवा, ब्रँडेड नमकीन, टूथ पावडर, टूथपेस्ट, साबण, केसांचे तेल, सामान्य प्रतिजैविक, वेदनाशामक औषधे, प्रक्रिया केलेले अन्न, स्नॅक्स, गोठवलेल्या भाज्या, कंडेन्स्ड मिल्क, काही मोबाईल, काही संगणक, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, गीझर यासारख्या वस्तू स्वस्त होणार आहेत.