वैरणीचा भारा घेवून येताना शेतकऱ्याचा मृत्यू: माले गावात हळहळ

<p>वैरणीचा भारा घेवून येताना शेतकऱ्याचा मृत्यू: माले गावात हळहळ</p>

पन्हाळा – माले येथील युवराज जामु पाटील (वव ५०) यांचा वैरणीचा भारा घेवून येताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

रानातून जनावरांसाठी वैरण आणून घरी परतत असताना बांधावरून पाय घसरल्याने ते खाली पडले. त्याच वेळी डोक्यावर ठेवलेला वैरणीचा भारा (बिंडा) अंगावर पडल्याने त्यांच्या मानेस गंभीर दुखापत झाली. यात मानेजवळील मज्जारज्जू तुटल्याचे निदान झाले. त्यांना कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, मज्जारज्जू तुटल्यामुळे खांद्या खालचा संपूर्ण भाग अकार्यक्षम झाला होता. डॉक्टरांनी केवळ हाडांची शस्त्रक्रिया शक्य असल्याचे सांगितले, पण हालचाल शक्य होणार नाही, अशी माहिती दिली.

 

उपचारांना फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे दोन दिवसांनंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आणि बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव नातेवाईकांकडे अंत्यविधीसाठी देण्यात आले.

सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते युवराज पाटील हे माले येथील सह्याद्री सहकार समूहाचे संचालक होते. त्यांचा सहकारी व सामाजिक वर्तुळात मोठा वावर होता. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.