कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील २५ ऑगस्टला राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश करणार
चंद्रदीप नरके पारंपरिक विरोधकच राहतील राहुल पाटील यांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर - स्वर्गीय पी. एन. पाटील यांनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली. मात्र त्यांच्या निधनानंतर आता त्यांचे पुत्र राहुल आणि राजेश पाटील यांनी, काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
२५ ऑगस्ट रोजी करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे सकाळी साडे अकरा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. भोगावती कारखान्याची आर्थिक अडचण दूर करणे, कार्यकर्त्यांची काम मार्गी लावणे यासाठी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे राहूल पाटील यांनी सांगितले.
दरम्यान महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असलो तरी आमदार चंद्रदीप नरके हे आमचे पारंपारिक विरोधकच राहतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पी. एन. पाटील गट म्हणूनच आम्ही लढवणार आहोत, असंही राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, 'गोकुळ'चे संचालक बाळासाहेब खाडे, 'भोगावती. कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील-भुयेकर, शंकरराव पाटील वरणगेकर, शिवाजी कवठेकर, हंबीरराव पाटील, शिवाजी आडनाईक, विजय पाटील, प्रकाश मुगडे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.