पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे...

<p>पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे...</p>

कोल्हापूर - धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं  राधानगरी धरणाचे दरवाजे खुले झाले असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरूय. यामुळं पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाट्यानं  वाढतीय. आज सायंकाळी  सात वाजता पंचगंगा नदीची पाणी  पातळी सदतीस फूट चार इंचावर जावून पोहोचलीय. पंचगंगा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरु असल्यानं  प्रशासन सतर्क झालंय.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुय. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं  राधानगरी धरणाचे सर्व सातही दरवाजे खुले झालेत. पंचगंगा नदीचं पाणी यंदा  पाचव्यांदा पात्रा बाहेर आलंय. संजय गायकवाड यांच्या पुतळ्यानजीक पंचगंगेचं पाणी जावून पोहोचलंय. आज सायंकाळी सात  वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधारा इथं सदतीस फूट चार इंचावर जावून पोहोचलीय.तर  जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 151.3 मिलीमीटर, तर सर्वात कमी 51.9 मिलीमीटर पाऊस गडहिंग्लज तालुक्यात झालाय.  हातकणंगले तालुक्यात 50.8 मिमी, शिरोळ तालुक्यात -34.4 मिमी, पन्हाळा तालुक्यात - 70.9 मिमी, शाहुवाडी तालुक्यात - 77 मिमी, राधानगरी तालुक्यात - 91.8 मिमी, करवीर तालुक्यात - 59.9 मिमी, कागल तालुक्यात - 72 मिमी, भुदरगड तालुक्यात - 92.2 मिमी, आजरा तालुक्यात - 66.9 मिमी, चंदगड तालुक्यात - 65.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झालीय.