एफ.आर.पी. प्रकरणात साखर संघ आणि राज्य सरकारचा रडीचा डाव : राजू शेट्टी यांचा आरोप

<p>एफ.आर.पी. प्रकरणात साखर संघ आणि राज्य सरकारचा रडीचा डाव : राजू शेट्टी यांचा आरोप</p>

कोल्हापूर – राज्य सरकार आणि राज्य साखर संघाने संगनमत करून पुन्हा एकदा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात खेळी चालवली आहे, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. एफ.आर.पी. (संपूर्ण हमी किंमत) तुकड्यांत देण्याच्या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, जवळपास तीन वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर एकरकमी एफ.आर.पी. देण्याचा निर्णय न्यायालयाकडून शेतकऱ्यांच्या बाजूने देण्यात आला होता. यामध्ये ५० तास सुनावणी झाली असून, राज्य सरकार, साखर संघ आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. तरीही न्यायालयाने शेतकऱ्यांचा मुद्दा ग्राह्य धरत निर्णय दिला होता.

राज्यात अनेक शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेवर मिळत नसल्याने आत्महत्या कराव्या लागत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब असून, साखर संघ व सरकार सर्वोच्च न्यायालयातही अयशस्वी ठरल्यावर आता पुन्हा रडीचा डाव खेळत आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला.

या नव्याने दाखल झालेल्या याचिकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ॲड. योगेश पांडे सोमवारी हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.