...आणि त्यांनी रेल्वे स्थानकावरच भरवली शाळा

<p>...आणि त्यांनी रेल्वे स्थानकावरच भरवली शाळा</p>

कोल्हापूर – हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला वाटल असेल शाळेची सहल आहे आणि ही मुलं रेल्वेची वाट पाहत बसली आहेत. पण वास्तव मात्र काही वेगळंच आहे. ही मुलं रेल्वेची वाट पहात नाही, तर रेल्वे प्लॅटफॉर्मवर मराठीचा पाठ शिकायला बसली आहेत. हा अनोखा उपक्रम राबवला आहे.

 कोल्हापूर मधील कोरगांवकर हायस्कूलचे प्रयोगशील शिक्षक सदाशिव हाटवळ यांनी पाठातील पात्रे ज्या ठिकाणी संवाद करतात, तेच वास्तव विद्यार्थ्यांना अनुभवता यावे,  यासाठी त्यांनी वर्गाच्या भिंती ओलांडून थेट रेल्वे स्थानकावरच पाठ शिकवायचं ठरवलं. यासाठी त्यांनी रेल्वे विभागाची रीतसर परवानगी घेतली आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर मुलांची शाळा भरवली. इयत्ता आठवीच्या मराठीच्या पुस्तकात 'लाखाच्या कोटीच्या गप्पा' हा पाठ आहे. या पाठातली पात्रं रेल्वे स्टेशन आणि रेल्वेत बसून संवाद साधतात. हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवता यावं आणि हा पाठ त्यांच्या नेहमी स्मरणात राहावा, या उद्देशानं त्यांनी हा उपक्रम राबवला. यातील काही पाठ प्लॅटफॉर्मवर बसून तर काही प्रत्यक्ष रेल्वेत बसून शिकवण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी नाट्यछटेतल्या पात्रांचं बोलणं, संवाद आणि वास्तवाशी असलेलं नातं अधिक परिणामकारक पद्धतीनं आत्मसात केल्याचे शिक्षक सदाशिव हाटवळ यांनी सांगितले.

या माध्यमातून खऱ्या अर्थाने 'बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो त्यांचे गुरु' या कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळी प्रयोगशील शिक्षक सदाशिव ह्राटवळ यांनी प्रत्यक्षात आणल्या. या उपक्रमासाठी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांचे मार्गदर्शन लाभले तर नागेश हंकारे, कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे प्रमुख आर. के. मेहता आणि स्नेहा पाटील यांचे सहकार्य लाभले.