तरुणांनी करिअरसाठी आव्हानात्मक क्षेत्र निवडावे - आम. सतेज पाटील

कोल्हापूर - 'कॉफी विथ सतेज पाटील' कार्यक्रमात कमला कॉलेजच्या विद्यार्थिनींसमवेत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. करिअरच्या संधी, शिक्षणातील आव्हाने, समाजातील महिलांचा प्रभाव, त्यांचे प्रश्न आणि स्त्रीशक्तीच्या नवीन संकल्पना यासारख्या विषयांवर या विद्यार्थिनींनी आमदार सतेज पाटील यांच्याशी दिलखुलास संवाद साधत अनेक प्रश्न उपस्थित केले. कॉफी विथ सतेज पाटील' या कार्यक्रमात कोल्हापूरच्या तरुणाईसोबत संवाद साधणं ही आपल्यासाठी आनंदाची पर्वणी ठरत असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. विद्यार्थिनींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आमदार पाटील यांनी उत्तरं दिली. जुन्या रुळलेल्या वाटा सोडुन नवीन आव्हानं स्वीकारा. एखादे क्षेत्र जेवढं आव्हानात्मक असते त्या क्षेत्रात करिअरची संधी आधिक असते. त्यामुळं तरुणांनी करिअर साठी आव्हानात्मक क्षेत्र निवडावं असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. तरुणांसाठी कोल्हापुरातच रोजगाराच्या संधीवर बोलताना त्यांनी शेंडा पार्कमधील जागा आयटी पार्क साठी आरक्षित केल्याचं सांगून कोल्हापुरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, कोल्हापूर सोडणार नाही ही मानसिकता तरुणांनी बदलली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. वेळेचं नियोजन करा. त्यामुळं, तुम्ही तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य दिशेनं वाटचाल करता.
संध्याकाळी झोपताना स्क्रीन टाईमचा विचार करा. स्क्रीन टाईम कमी करून अभ्यासाकडं लक्ष केंद्रित करा. टेड टॉक बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ऑन लाईन मोफत कोर्सेस आहेत. त्याची माहिती घ्या.. तुमचं आयुष्य सेट करायला तुमच्याकडं माहितीचा महासागर आहे. त्यामुळं करिअर बनवताना त्याचा फायदा घ्या. असंही आमदार पाटील यांनी विद्यार्थिनींना सांगितलं.
यावेळी विद्यार्थिनींनी शहरातील वाहतूक समस्या त्याचबरोबर शहरात येणारे पुराचे पाणी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या, विविध विकास कामांची त्यांनी माहिती दिली. यूपीएससी आणि एमपीएससीची तयारी आतापासून करा. जनरल नॉलेज वाढवा. असा कानमंत्रही आमदार पाटील यांनी विदयार्थिनींना दिला.