यड्रावमधील अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची दुरवस्था – समतावादी महासंघ आक्रमक

<p>यड्रावमधील अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची दुरवस्था – समतावादी महासंघ आक्रमक</p>

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील यड्राव गावात मागील २० ते २५ वर्षांपूर्वी मातंग समाजासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची उभारणी करण्यात आली होती. या मंदिराचा उद्देश समाजातील नागरिकांना विशेषतः युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी एक सुसज्ज वाचनालय व सभागृह निर्माण करणे हा होता. परंतु सध्या या समाज मंदिराची अत्यंत दुरावस्था झालेली असून खिडक्या व दरवाजे खराब झाले आहेत. रंगसुद्धा उतरलेला आहे. संरक्षण भिंती मोडकळीस आल्या आहेत. गेट तुटलेले आहे आणि परिसरात गवताची झुडूपं उगवली आहेत. या दुरवस्थेबाबत अनेक वेळा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासनाला कल्पना देण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतचे लेखी निवेदनही ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे. येत्या १५ दिवसांत समाज मंदिराची डागडुजी आणि स्वच्छता न केल्यास समतावादी महासंघाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.