स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी एकसदस्यीय प्रभाग प्रणाली पुन्हा लागू करावी : अॅड. असीम सरोदे

कोल्हापूर - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे महापालिकेच्या निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून कोल्हापुरात आगामी निवडणूकीत चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहे. दरम्यान, चार सदस्यीय प्रभाग रचनेचा अभ्यास पुण्यातील द युनिक फौंडेशनने करून एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात एक सदस्य प्रभाग पद्धती आणि बहुसदस्यीय प्रभाग पद्धती याबद्दल लोकांचे मत अजमावण्यात आले आहे. चार सदस्यीय प्रभाग रचना ही चुकीची असून स्थानिक स्वराज्य संस्थांची संकल्पना उध्वस्थ करणारी आहे. ही प्रणाली रद्द करून एकसदस्यीय प्रभाग प्रणाली पुन्हा लागू करावी, असा निष्कर्ष या अहवालात नोंदवण्यात आला आहे. प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क मिळण्यासाठी प्रभाग रचना करता येते. कायद्याने शासनाला तसा अधिकार दिला आहे. पण या अधिकाराचा शासन मोठ्या प्रमाणावर गैरवापर करत आहे. यातून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधत सत्ता संपादन करण्यासाठी सध्याची बहु सदस्य प्रभाग रचना केली जातीय, असा आरोप अॅड. असीम सरोदे आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी पत्रकार बैठकीत केलाय.
दरम्यान, चार सदस्यीय प्रभाग रचना ही लोकशाही प्रक्रियेच्या मूळ तत्वांना बाधा आणणारी असून ही प्रणाली रद्द करून एकसदस्यीय प्रभाग प्रणाली पुन्हा लागू करावी. या विरोधात आवाज उठवण्यासाठी समाजातील संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अॅड. असीम सरोदे यांनी केले आहे. या बैठकीला अॅड. योगेश सावंत आणि अॅड. हेमा काटकर उपस्थित होते.