अखेर कोल्हापुरात सर्किट बेंच चे स्वप्न साकार… सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर - कोल्हापूरकरांच्या दीर्घकाळच्या प्रतीक्षेला अखेर यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच ची मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित होती. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावे, ही मागणी गेली अनेक दशकांपासून सुरू होती. या मागणीसाठी अनेक आंदोलने, निवेदने आणि प्रयत्न झाले. अखेर आज ही प्रतीक्षा संपली आणि कोल्हापुरातील न्यायप्रेमींसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सर्किट बेंच चे उद्घाटन पार पडले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य न्यायाधीश अलोक अराधे, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार , खा. शाहू महाराज, खा. धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्ह्यातील वरिष्ठ वकील व न्यायप्रविष्ट नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
सर्किट बेंच च्या स्थापनेमुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईपर्यंत धावपळ न करता स्थानिक पातळीवरच न्याय मिळू शकणार आहे. त्यामुळे ही कोल्हापुरासाठी न्याय क्षेत्रातील ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घडामोड ठरली आहे. सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. हा सोहळा केवळ न्यायिक नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.