अरे बापरे सापाची तब्बल 12 अंडी...पहा व्हिडीओ

निवडे गावातील सर्पमित्र डॉ.आर.के. पाटील यांनी पकडलेल्या तस्कर सापला जिवदान...

कोल्हापूर -  एक दोन नव्हे तर तस्कर जातीच्या सापाने तब्बल 12 अंडी घातली आहेत. निवडे गावातील सर्पमित्र डॉ.आर.के. पाटील यांनी पकडलेल्या या तस्कर सापाला 12 अंंड्यासहित जिवदान दिले असुन सापाला सुरक्षितपणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे.

केवळ हौस किंवा छंद म्हणून नाही तर संपूर्ण जीवनच प्राणी शास्त्राचा अभ्यास करणारे गगनबावडा तालुक्यातील निवडे गावातील सर्पमित्र डॉ. आर.के. पाटील या अवलियाने आत्तापर्यंत हजारो सापांना जीवदान दिलं आहे. काही दिवसापुर्वी गगनबावडा तालुक्यातील निवडे गावातील पशु वैद्यकीय दवाखान्यात मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान सर्पमित्र पाटील यांना साप असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तस्कर जातीच्या सापाला पकडलं होतं. तस्कर जातीच्या या सापाला सुरक्षित पकडून जंगल अधिवासात सोडण्याच्या उद्देशाने सर्पमित्र डॉक्टर आर. के. पाटील यांनी  सापाला एका प्लास्टिकच्या बरणीत घालून घरी नेलं. दुसऱ्या दिवशी जंगलात सोडण्यासाठी साप सुरक्षित आहे का हे पाहताना आर. के. पाटील यांना सापाने सुमारे 12 अंडी घातल्याचे निदर्शनास आले.

बहुतेक साप अंडी देऊन निघून जातात. याला अपवाद फक्त किंग कोब्रा असतो. तो अंड्याची देखरेख करतो. मात्र तस्कर मादी साप अंड्यांभोवती गुंडाळून बसते आणि त्यांना उबवते. काही दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. यामुळे सर्पमित्र डॉक्टर आर के पाटील यांच्यापुढे प्रश्न होता की ही अंडी करायची काय? कारण सापांच्या अंड्यांना मांजरापासून धोका असतो, याशिवाय या अंड्यातून आणखी साप जन्माला येणार होते. हे लक्षात घेता सापाला जंगलात न सोडता याची माहिती त्यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनरक्षक यांनी या ठिकाणी भेट देऊन सापाची पाहणी केली. यानंतर सर्पमित्र डॉ. आर.के.पाटील यांनी पकडलेला तस्कर जातीचा साप वनविभागाच्या ताब्यात दिला. प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी मिलींद गोवकर यांनी हा साप ताब्यात घेऊन त्याला कोल्हापुरातील रेस्क्यू टीमला सुपूर्द केला आणि  त्याला पूर्नउत्पादन केंद्रात पाठवण्यात येणार असल्याची माहिती दिली.