अल्पवयीन मुलीनं स्वतःला संपवलं किणी गावातील प्रकार

पोलिस होण्याचं स्वप्न बघणारी ती ठरली एकतर्फी प्रेमाचा बळी

<p>अल्पवयीन मुलीनं स्वतःला संपवलं किणी गावातील प्रकार</p>

किणी मधील जमीर महाबरी हे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करून, तर त्यांची पत्नी वाठार मधील एका दुकानात मजूरी करुन तीन मुलांचा सांभाळ करतात. त्यापैकी आयेशा आई-वडीलांच्या कष्टाची जाण ठेवत पोलिस होण्याचं स्वप्न बाळगून प्रयत्न करत होती. अचानकपणे महाबरी कुटुंबाला कुणाची तरी दृष्ट लागली आणि गावातल्याच अल्पवयीन मुलानं एकतर्फी प्रेमातून आयेशाला त्रास द्यायला सुरुवात केली. तीन महिने हा प्रकार सुरु होता. आयेशानं घरी याबाबत सांगितल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी त्या मुलाच्या घरच्यांना त्याला समज द्यायला लावली. त्यानंतरही त्यानं आयेशाचा पाठलाग करणं थांबवलं नाही. तेरा ऑगस्टला त्या मुलानं आयेशा कॉलेजवरुन घरी येत असताना बस मध्ये तिच्या बाजूला बसत तू माझी झाली नाहीस तर दुसऱ्या कुणाचीही होऊ देणार नाही असं सांगत तिला धमकावलं. यानंतर आयेशानं दुपारी आईला फोनवरून घडलेला प्रकार सांगितला. पण सायंकाळी पाच वाजता आयेशा घरी आली त्यावेळी वेगळंच दृश्य दिसलं. एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलाचा त्रास असह्य झाल्यामुळं आयेशानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान एका अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आयेशानं आत्महत्या केल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावात असंतोष निर्माण झाला. संबंधित मुलावर कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला. अखेर पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला असल्याचं सांगितल्यानंतर नातेवाईकांनी आयेशाचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. गावातील संतप्त ग्रामस्थांनी संबंधित मुलाच्या घरावर चालून जात त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी याची माहिती मिळून सुध्दा त्यांनी गावात यायला टाळाटाळ केली. अखेर गावातील काही जबाबदार लोकांनी त्या मुलाची जमावाच्या तावडीतून सुटका केली. संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी रात्री गावातून कॅण्डल मार्च काढत आयेशाला श्रद्धांजली देत, तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मुलाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

या कँडल मार्च मध्ये सहभागी होत उपसरपंच अशोक माळी, नंदकुमार माने,रेश्मा मुजावर, अॅडव्होकेट एन आर पाटील, अण्णा मगदूम, धीरज चव्हाण, प्रदीप धनवडे, विजयसिंह चव्हाण यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी केली. या कँडल मार्च मध्ये किणी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.