आमचा मंत्री शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवायच्या सोडून विधानसभेमध्ये पत्ते खेळतो, किती दुर्दैव आहे आमचं...
शालेय विद्यार्थ्यानं मंत्र्यांना दाखवला आरसा

जालना – स्वातंत्र्य दिनानिमित्त जालना जिल्ह्यातील रेवल गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या चौथीच्या वर्गातील कार्तिक वजीर उर्फ भोऱ्या या विद्यार्थ्याने आपल्या भाषणातून मंत्री माणिकराव कोकाटे यांना चांगलाच आरसा दाखवलाय.
भोवऱ्याने, समाजातील विषमतेवर, राजकारणातील दुटप्पीपणावर आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवर थेट भाष्य करून अनेकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या आर्थिक अस्थिरतेबाबत भाष्य करत त्याने मंत्र्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
आपण निवडलेला मंत्री विधानसभेमध्ये रमी खेळतो, तरी त्याला याचं काही वाटत नाही. शेतकरी शेतीत लाखो रुपये टाकतात, पिक येईल का नाही? हे त्यांना माहीत नसतं. आमचा मंत्री शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवायच्या सोडून विधानसभेमध्ये पत्ते खेळतो, किती दुर्दैव आहे आमचं, अशी टीका त्याने मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे.