''यांनी'' तब्बल एक कोटी रुपयांचं कृषी अनुदान लाटल्याचा मनसेचा गंभीर आरोप

बोगस कागदपत्रांच्या आधारे आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं तब्बल एक कोटी रुपयांचं कृषी अनुदान लाटण्यात आल्याचा गंभीर आरोप कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आलाय. याप्रकरणी चंदगड तालुक्यातील शिवमुद्रा शेतकरी गट आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेनं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालंदर पांगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीय.
चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावामध्ये शिवमुद्रा शेतकरी गटाच्या माध्यमातून नाचणा प्रकल्प उभारण्यात आलाय. या गटाच्या स्थापनेपासूनच बोगस कागदपत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान उचलण्यात आलंय असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आरोप केलाय. याप्रकरणी चंदगड तालुक्यातील शिवमुद्रा शेतकरी गट आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेनं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालंदर पांगरे यांच्याकडं निवेदनाद्वारे केलीय. यावेळी गट नोंदणी आणि प्रकल्प उभारणीसाठी कृषी कार्यालयात देण्या आलेली कागदोपत्री माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांनी सादर केली. या गटामध्ये शेतकरी सभासदांची चुकीच्या पद्धतीनं नोंद करण्यात आलीय. प्रकल्प उभारणीवेळी बेकायदेशीररित्या वाढीव सभासदांची भर घालण्यात आली. याप्रकरणी आत्मा प्राधिकृत अधिकाऱ्यांची मान्यता घेण्यात आली नाही. या मशिनरींच्या बिलांवर केवळ GST नंबर जोडले असून, प्रत्यक्षात ही सर्व जुनी आणि वापरलेली मशिनरी प्रकल्पस्थळी बसवण्यात आलीय . मशिनरीच्या बिलांवरील सर्व जीएसटी नंबर तपासण्यासाठी जीएसटी आयुक्तांना त्वरित पत्र पाठवण्यात यावं, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलीय. सरकारी योजनांची लूट करणाऱ्यांची येत्या ७ दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अन्यथा 'मनसे स्टाईल' तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा मनसेचे शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी दिलाय.
यावेळी मनसेचे निलेश धुम्मा, निलेश आजगावकर, यतिन होरणे, अभिजीत राऊत, अजिंक्य शिंदे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.