मूर्ती संवर्धनानंतर श्री अंबाबाई मंदिरात भाविकांच्या दर्शनाला आजपासून पुन्हा सुरुवात

<p>मूर्ती संवर्धनानंतर श्री अंबाबाई मंदिरात भाविकांच्या दर्शनाला आजपासून पुन्हा सुरुवात</p>

कोल्हापूर - श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया अखेर पूर्ण झालीय. मंदिराचा मुख्य गाभारा पुन्हा भाविकांसाठी खुला करण्यात आलाय. मूर्ती संवर्धना नंतर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांच्या दर्शनाला आजपासून पुन्हा सुरुवात झालीय.

कोल्हापुरच्या श्री अंबाबाई मंदिरातील  मूळ मूर्तीवर गेल्या दोन दिवसांपासून रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया सुरू होती. संवर्धनादरम्यान, गाभाऱ्यातील आर्द्रतेमुळं पडलेले पांढरे डाग दूर करण्यात आले. या प्रक्रियेसाठी मंदिराचा गाभारा दोन दिवस बंद ठेवण्यात आला होता .  त्या काळात देवीतत्त्वाची प्रतिष्ठापना कलशपेटी चौकात करण्यात आली होती.संवर्धन प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली.

संवर्धन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यामुळं आजपासून मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांसाठी खुलं करण्यात आलं असल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितलं.

संवर्धनानंतर मूर्तीच्या चेहऱ्यावरील बारकावे आता अधिक स्पष्ट दिसत असून उत्सवमूर्तीचं सौंदर्यही खुलून आलंय.श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन पुन्हा सुरू झाल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.