ऐतिहासिक रंकाळा बनलाय ‘म्हैशींचा स्विमिंग टँक’

<p>ऐतिहासिक रंकाळा बनलाय ‘म्हैशींचा स्विमिंग टँक’</p>

कोल्हापूर - ऐतिहासिक रंकाळा तलाव ही केवळ नैसर्गिक शोभा नाही, तर कोल्हापूरची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शान आहे. जगभरातून पर्यटक येथे येतात. मात्र, सध्या सकाळी रंकाळा ट्रॅकवर लोकांऐवजी म्हशी फेरफटका मारताना दिसतायेत, आणि तलावात म्हशी पोहताना दिसत आहेत. हा तलाव म्हशींच्या मालकांसाठी फ्री स्विमिंग टँक झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येतं आहे.

काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वतः रंकाळा तलाव परिसराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी तलावात म्हैशी सोडणाऱ्यांवर १० हजार रुपये दंड आकारण्याचे तोंडी आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. पण यावर आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही. अतिक्रमणाचा विळखा, सांडपाण्याची मिसळ, बेशिस्त वाहन पार्किंग, बंद पडलेल्या हातगाड्यांची अस्ताव्यस्त अवस्था यामुळे रंकाळ्याचे सौंदर्य विद्रप होतंय. एकीकडे सुशोभीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांचे काम सुरू असताना, दुसरीकडे तलावाचे विद्रुपीकरण महापालिकेच्या निष्काळजीमुळे सुरुच आहे.

त्यामुळे महापालिकेचा ढिसाळ कारभार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी आता थेट कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.