धान्य व्यापारी मंडळाचा वरदविनायक आगमन व प्रतिष्ठापना सोहळा

कोल्हापूर : कोल्हापुरातील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील पहिला पर्यावरणपूरक व कायमस्वरूपी वरदविनायक आगमन व प्रतिष्ठापना सोहळा पार पडणारय. वरदविनायक मंदिराच्या चौथऱ्यावर नैसर्गिक साधनसामुग्रीपासून साकारलेली आणि विधिवत प्राणप्रतिष्ठित मूर्ती शुक्रवारी १५ ऑगस्ट २०२५ रोजी विधीवतपणे स्थापित केली जाणारय, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव आणि उपाध्यक्ष सागर सन्नकी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुरातील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील पहिला पर्यावरणपूरक व कायमस्वरूपी वरदविनायक आगमन व प्रतिष्ठापना सोहळा पार पडणारय. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच साकारली गेलेली ही मूर्ती एक अनन्यसाधारण आणि पर्यावरणपूरक उपक्रम ठरणारय. २ ऑक्टोबर २०२४ रोजी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मातीपूजन करून मूर्ती निर्मितीची सुरुवात करण्यात आली. मूर्तीसाठी गळलेली पानं, फुलं, वेल, सालं, मुंगळीने, आणि बाभळीच्या डिंकाचे मिश्रण वापरून सुमारे तीन महिन्यांमध्ये मूर्ती पूर्णत्वास आली. टिकाऊपणासाठी कागद, कागदी पुट्टा व लाकडाचा वापर, तर सौंदर्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या, झाडांची सालं व हळदीचे नैसर्गिक रंग वापरण्यात आलेत. रंगकामासाठी वापरले गेले डाळिंब आणि पारंपरिक हळद यांचे रंग, मूर्तीला आकर्षक आणि पारंपरिक रूप देतात. ही मूर्ती सुप्रसिद्ध मूर्तिकार संदीप कातवरे यांनी साकारली असून ती केवळ शारीरिक नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्याही समृद्ध आहे. मूर्तीच्या पोटामध्ये श्रीयंत्र, गणेशयंत्र यांसारख्या पवित्र यंत्रांचा समावेश आहे.
स्थापनेसाठी वापरला जाणारा दशमुखी, सव्वा फुट उंच सागवान लाकडाचा विशेष पाट हे हत्तीच्या मुख आणि सिंहाच्या पंज्याचे प्रतीकात्मक रूप दर्शवतो. स्थापनेपूर्वीची सर्व वास्तुशांती आणि शास्त्रोक्त विधी सुप्रसिद्ध पुरोहित गुरु स्वामी यांच्या हस्ते पार पडलीत. हा प्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी १५ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडणार असून, याला कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि योगेश जाधव यांची विशेष उपस्थिती राहणारय. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्व गणेशभक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन या मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव आणि उपाध्यक्ष सागर सन्नाकी यांनी केलंय.
या पत्रकार परिषदेला मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव, उपाध्यक्ष सागर सन्नाकी, सेक्रेटरी बलराज निकम, खजिनदार विजय कागले, तसेच सुरेश लिंबेकर, किशोर तांदळे, गणेश सन्नकी, राजेश आवटे, राजेंद्र लकडे, वैभव सावर्डेकर, विवेक शेटे यांच्यासह मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.